क्लबफूट ( जन्मत: पावलात बाक असणे)

क्लबफूट म्हणजे काय ?
क्लबफूट म्हणजे जन्मत: पाऊलामध्ये आतल्या बाजूने बाक असणे. हे एका किंवा दोन्ही पावलांना असू शकतं.हजार नवजात शिशुंपैकी १-२ अर्भकांमध्ये आढळणारे हे व्यंग, मुलांमध्ये मुलींपेक्षा तिप्पट प्रमाणात जास्त आढळते.

हे अनुवांशिक आहे काय?
क्लबफूट हे व्यंग अनुवांशिक नाही. हे जनुकांशी निगडीत असले तरी यासाठी आई वा वडिलांनी स्वत:ला दोष देऊ नये. स्नायुंमधील असमतोल तसेच स्नायुंमधील कोलॅजन -१ चे बदललेले स्वरुप यांच्यामुळे हे होत असावं असं शास्त्रीय अभ्यास सांगतो. गर्भाशयामध्ये गर्भाला जागा कमी मिळणे हे देखील एक कारण मानण्यात येते.

हा बाक दुरुस्त होतो का?
योग्य वेळी व योग्य प्रकारे उपचार केल्याने पाऊल पुर्ण सरळ व चालण्यास सक्षम होऊ शकते.
आधुनिक उपचार पद्धतीप्रमाणे यासाठी जन्मानंतर पहिल्या एक ते दोन आठवड्यामध्ये तळपायाला विशिष्ठ पद्धतीने प्लॅस्टर लावण्यास सुरुवात करावी लागते. दर सात दिवसांनी हे प्लॅस्टर बदलत क्रमश: पाऊल सरळ होते. काही बाळांना प्लॅस्टरनंतर टाचेच्या वरच्या बाजूस अखडलेला एक स्नायु लांब करण्यास छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. चार ते आठ प्लॅस्टर व अडीच ते तीन महिन्यात पुर्ण होणाय्रा या उपचारानंतर व्यायाम व विशिष्ठ प्रकारचे बूट वापरल्यास पाय चांगल्याप्रकारे सरळ ठेवता येतात.

उपचार थोडे उशिरा सुरु केले तर चालतील का?
उपचार सुरु करण्यास जेवढा उशीर होईल, तेवढा स्नायुंमधील असमतोल वाढतो व त्यामुळे तिथल्या शिरा व अस्थिबंध जास्त घट्ट होऊन प्लॅस्टरला मिळणारा प्रतिसाद कमी होत जातो. वयाच्या सहा महिन्यांनंतर शस्त्रक्रिया लागण्याची शक्यता खूप जास्त वाढते.

मालिश व पट्टा वापरण्याचा सल्ला आम्हाला मिळला आहे…….
आधुनिक उपचार पद्धत म्हणून डॉ. पॉन्सेटी, अमेरिका यांनी विकसीत केलेली वरील पद्धती प्रचलीत होण्यापुर्वी, मसाज, चिकटपट्टीने पायाला बांधणे, वेगवेगळ्या कालमर्यादेचे प्लॅस्टर लावणे, पट्टा बांधणे हे विविध उपचार केले जात होते. या उपचारांनी फार कमी वेळेला अपेक्षित परिणाम मिळत असे व बहुतेक वेळा सरतशेवटी शस्त्रक्रिया लागत असे.

उपचार पुर्ण झाल्यानंतर पुढे काही त्रास उद्भवू शकतो का?
उपचार पुर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या देख्ररेखीमध्ये व्यायाम व बूटांचा योग्य वापर सुरु ठेवल्यास काहीही त्रास होत नाही. क्वचित प्रसंगी मुल चालायला लागल्यानंतर पाय उचलताना जर पाऊल आत ऒढण्याची स्नायुची सवय गेली नाही तर वय वर्ष तीन ते पाच यादरम्यान स्नायुची दिशा बदलण्याची शस्त्रक्रिया लागू शकते.