सेरेब्रल पाल्सीविषयी समजवून घ्या.

… हा विकार मुळात मेंदूशी संबंधीत आहे.
जन्मापुर्वी, जन्माच्यावेळी वा जन्मानंतर मेंदूला झालेल्या इजेमुळे, मेंदूचे स्नायूंवरील कमी झालेले नियंत्रण व त्यामुळे हालचालींवर झालेल परिणाम म्हणजे सेरेब्रल पाल्सी होय !
यातील फक्त दहा टक्के बाळांना प्रसुति दरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूस इजा होते. बाकी बाळांमध्ये गर्भावस्थेत वा प्रसुतिनंतर मेंदूस इजा झालेली आढळून येते.
…बाळ अजून चालत नाही?
मेंदूचे स्नायूंवरील नियंत्रण कमी झाल्यामुळे, स्नायुंमध्ये ताठरपणा ( स्पास्टिसिटी) येतो, स्नायुंमधील ताकद कमी होते आणि मेंदूच्या नियंत्रणाखाली असलेली सांध्यांची हालचाल अनियंत्रीत होते. तसेच तोल सांभाळणे ही क्रियादेखील मेंदूस अवघड जाते.
यामुळे बाळाने मान धरणे या घटकापासून उशीर होण्यास सुरुवात होते, पण बहुतेक पालक चालण्यास उशिर होईपर्यंत वाट बघितल्यानंतर येतात.
….बाळ चालेल ना?
मेंदूचा स्नायुंवर आणि पर्यायाने सांध्यांवर नियंत्रण येण्यासाठी, मेंदूच्या इजा न झालेल्या भागाने ते कार्य करण्यास सुरुवात करणे अपेक्षित असते.हे कार्य त्याभागाला शिकावे लागते आणि म्हणून मेंदूला झालेली इजा किती तीव्र आहे आणि मेंदूस ते कार्य आपण कधी शिकवण्यास सुरु करतो यावर ते अवलंबून आहे.
हे मेंदूस शिकवणे म्हणजे मेंदूला त्या हालचाली परत-परत करायला लावणे; ज्याला आपण भौतिकोपचार अथवा फिजिओथेरपी असे म्हणतो.
….बाळ बरं होईल ना?
पालकांनी हे समजवून घेणे महत्त्वाचे आहे की सेरेब्रल पाल्सी ही व्याधी झालेलं बाळ हे ती व्याधी घेऊनच मोठं होतं कारण मेंदूला झालेली इजा आपल्याला दुरुस्त करणे शक्य होतं नाही. आपण जे उपचार करतो ते त्या इजेमुळे स्नायुंवर आणि पर्यायाने सांध्यावर झालेल्या दुष्परिणामांचे.
…. ऑपरेशन लागेल का ?
सी.पी. ( सेरेब्रल पाल्सी) च्या उपचारामध्ये सर्वात महत्त्वाची आहे ती फिजिओथेरेपी किंवा व्यायाम.
स्नायुंमध्ये ताकद येणे, सांध्यांवर नियंत्रण येणे आणि, तोल सांभाळता येणे याकरिता व्यायामाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
स्नायुंमधील ताठरपणा कमी करण्यासाठी औषधोपचार आणि सांध्यांवरील परिणाम दूर करण्यासाठी गरज पडली तर शस्त्रक्रिया असे उपचाराचे एकंदर स्वरुप असते.
….ताठरपणा कसा कमी करता येतो?
स्नायू शिथिल असताना रबरसारखे दाबले जाऊ शकतात, याला वैद्यकीय भाषेत टोन असे म्हणतात. सी.पी. मध्ये हा टोन वाढलेला अढळतो. याला कमी करणे गरजेचे असते कारन त्याशिवाय स्नायूंमधील ताकद आणि स्नायूंचा योग्य वापर शक्य होत नाही.
हा टोन कमी करण्यासाठी काही औषधं आणि बोटुलिनम टॉक्सिन नावाचे इंजक्शन चांगले काम करते.
….. बोटुलिनम टॉक्सिन विषयी थोडेसे.
बोटुलिनम टॉक्सिन हे स्नायूंमध्ये टोचले जाते. ज्या स्नायूमध्ये ते दिले जाईल, फक्त तोच स्नायू शिथील होतो आणि त्या स्नायूच्या विरुद्ध दिशेने काम करणाय्रा स्नायूस गती मिळते. यामुळे जो स्नायू फिजिओथेरेपी मध्ये अडसर ठरतो फक्त त्याची ताठरता कमी करून स्नायूंमध्ये तोल साधता येतो.
या इंजक्शनचा परिणाम साधारणत: ३ ते ६ महिने राहतो. या काळात व्यायाम करुन स्नायूंची लवचिकता आणि ताकद वाढवल्याने  स्नायूंमधील तोल साधतो व  सांध्याची हालचाल नियंत्रीत होते.

…..शस्त्रक्रिया कधी केली जाते?
वय वाढताना स्नायूच्या ताठरपणामुळे त्यांची वाढ हाडांच्या तुलनेत मागे पडते आणि त्यामुळे स्नायू लांबीला कमी असतात. त्याचा परिणाम सांध्यांवर होऊन पर्यायाने हाडंवर होतो. हे टाळण्यासाठी व झाल्यास उपचार म्हणून शस्त्रक्रिया केली जाते.
ही शस्त्रक्रिया स्नायूंवर वा गरज पडली तर हाडांवर केली जाते.
शस्त्रक्रिया ही व्यायामाला पर्याय नसून व्यायामाला पुरक आहे हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे.